शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथील प्राचार्यांच्या मनमानी कार्यपद्धतीविरोधात कर्मचाऱ्यांचे तीव्र निषेध आंदोलन

धुळे | दि. २२ डिसेंबर २०२५

सा पोलीस व्हिजन धुळे….शासकीय तंत्रनिकेतन, धुळे येथील प्राचार्य डॉ. राजू वाडेकर यांच्या कार्यालयीन कामकाजाची कार्यपद्धती ही मनमानी, अरेरावी, हुकुमशाही व दडपशाहीची असल्याचा आरोप करत संस्थेतील अधिकारी व कर्मचारी तीव्र असंतोष व्यक्त करत आहेत. प्राचार्यांच्या वर्तणुकीमुळे संस्थेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले आहे, असा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
या संदर्भात यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री तसेच संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आपली व्यथा मांडली होती. मात्र, त्याची कोणतीही दखल न घेता संबंधित प्राचार्यांची मनमानी अधिकच वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या अन्यायकारक कार्यपद्धतीविरोधात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला असून, आज या विषयावर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, धुळे यांच्या वतीने शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी, धुळे यांचे प्रतिनिधी अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले.या शिष्टमंडळात श्री. राजेंद्र माळी – जिल्हाध्यक्ष श्री. दीपक पाटील – सरचिटणीस ,श्री. अविनाश मोरे – जिल्हा कार्यालयीन सचिव ,शासकीय तंत्रनिकेतनचे श्री. प्रवीण राजपूत श्री. श्याम साळकर यांचा समावेश होता.निवेदनाद्वारे संबंधित प्राचार्यांना तात्काळ ताकीद देऊन त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप न केल्यास व परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.