धुळे : अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित एकनाथ महाराज हायस्कूल, रानमळा (ता. जि. धुळे) येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य सायबर डिपार्टमेंटच्या वतीने विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ‘सायबर क्राईम व फ्रॉड’ याविषयावर विशेष जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक के. पी. पाटील (बापूसाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रल्हाद साळुंखे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक एस. आर. सूर्यवंशी उपस्थित होते.
प्रशिक्षणातील मुख्य मुद्दे व मार्गदर्शन:
एस.एस.व्ही.पी.एस. (SSVPS) कॉलेजच्या कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले:
- सायबर फ्रॉडची माहिती: ओमप्रकाश नरेंद्र सोनार याने सायबर गुन्हे कसे घडतात आणि त्यापासून सतर्क कसे राहावे, याचे सविस्तर विश्लेषण केले.
- OTP फ्रॉड व सुरक्षितता: वेदांत किरण देवरे याने मोबाईलवर येणारे ओटीपी (OTP) शेअर केल्याने होणारी आर्थिक व वैयक्तिक फसवणूक यावर जनजागृती केली.
- सोशल मीडिया व गेमिंग सुरक्षा: दुर्गेश प्रताप साळुंखे याने ऑनलाईन गेम्स, फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरताना होणाऱ्या सायबर क्राईमच्या धोक्यांची माहिती दिली.
- पोलीस सायबर सेलची कार्यप्रणाली: अध्यक्षीय भाषणात प्रल्हाद साळुंखे यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘सायबर क्राईम ब्रँच’ची रचना आणि कार्यप्रणाली विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
कार्यक्रम सूत्रसंचालन व नियोजन:
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सी. एस. भदाणे यांनी केले, तर उपशिक्षक नित्यानंद पवार यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मंगला देसले, उपशिक्षक सचिन पावरा आणि शिक्षकेतर कर्मचारी सुभाष शिंदे यांनी सहकार्य केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत सायबर जगतात सुरक्षित राहण्याचे धडे घेतले.


