वैचारिक लढाई विरुद्ध दडपशाही : धुळे शहराच्या राजकारणाची दिशा नेमकी कोणती?

धुळे शहरातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. शहरातील दोन गटांमध्ये सुरू असलेले शाब्दिक द्वंद्व, 'हिंदुत्ववादी चेहरा' कोण यावरून होणारे आरोप-प्रत्यारोप आणि अवैध धंद्यांच्या मुद्द्यावरून लोकप्रतिनिधींना विचारले जाणारे प्रश्न यामुळे शहराचे राजकारण ढवळून निघाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राजकीय परिपक्वता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शहराचा खरा विकास या मुद्द्यांवर गंभीरपणे चिंतन करण्याची वेळ आली आहे.
 लोकशाही व्यवस्थेत सामान्य नागरिकांना किंवा विरोधकांना सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. शहरातील अवैध धंदे किंवा मूलभूत समस्यांवरून लोकप्रतिनिधींना जाब विचारणे हे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे. मात्र, टीकेची पातळी ही नेहमीच सुसंस्कृत आणि वैचारिक असावी. जर कोणावर वैयक्तिक पातळीवर चिखलफेक होत असेल, चारित्र्यहनन केले जात असेल किंवा एखाद्या महिलेच्या सन्मानाला धक्का पोहोचेल असे आक्षेपार्ह लिखाण वा वक्तव्य केले जात असेल, तर ते निषेधार्हच आहे. अशा प्रकरणांची सखोल चौकशी होऊन कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
परंतु, दुसरीकडे टीकेला प्रत्युत्तर देताना कायदा हातात घेणे, कार्यकर्त्यांकडून दमदाटी होणे किंवा मारहाणीचे, हल्ल्याचे प्रकार घडणे हे देखील लोकशाही मूल्यांना धरून नाही. सत्ता ही दहशत निर्माण करण्यासाठी नसून समाज आणि शहराच्या कल्याणासाठी असते, ही जाणीव प्रत्येक राजकीय घटकाने ठेवणे गरजेचे आहे. टीकेला उत्तर हे विचारांनी आणि कामातून दिले जावे, दडपशाहीने नव्हे.
 राजकीय वादविवादांच्या या गदारोळात धुळे शहराचे खरे आणि जिव्हाळ्याचे प्रश्न बाजूला पडत आहेत की काय, अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे. धुळे शहराची हद्दवाढ झाली असली, तरी त्या प्रमाणात उत्पन्नाचे स्रोत आणि पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पाणीटंचाई, बेरोजगारी, निकृष्ट रस्ते आणि उद्योगांचा अभाव या समस्यांनी शहरवासीय त्रस्त आहेत. अवैध धंद्यांविरोधात अनेकदा आंदोलने आणि उपोषणे होऊनही ठोस परिणाम दिसत नसल्याने सामान्य माणूस हतबल झाला आहे.
 कोणत्याही शहराचा औद्योगिक विकास तेव्हाच होतो, जेव्हा तिथे शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण असते. उद्योजक आणि गुंतवणूकदार एखाद्या शहरात येण्यापूर्वी तेथील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतात. शहरात जर गुंडगिरी, भाईगिरी आणि राजकीय संघर्षाचे वातावरण राहिले, तर बाहेरचे उद्योग धुळ्याकडे पाठ फिरवतील आणि याचा थेट फटका स्थानिक तरुणांच्या रोजगाराला बसेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला *"लढाई जिंकायची असेल तर ती मेंदू (विचार) आणि पेनाच्या (लेखणीच्या) आधारे लढली पाहिजे"* हा संदेश आजच्या राजकीय परिस्थितीत अत्यंत समर्पक ठरतो. धुळ्याच्या राजकारणाने यापूर्वी सुसंस्कृत आणि वैचारिक नेतृत्वाचा काळ पाहिला आहे. सद्यस्थितीत राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
 शहराची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घेणे ही सर्वच राजकीय पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे. वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारून पाणी, रस्ते, उद्योग आणि रोजगार यांसारख्या रचनात्मक कामांवर लक्ष केंद्रित केले, तरच धुळे शहर प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करू शकेल. सौजन्य लेखन....*हृषी चंद्रकला जगतराव सोनवणे*

(दैनिक मतदार)✍🏼✍🏼✍🏼✍🏼