अमेरिका – प्रा प्रकाश सोनवणे यांचा तिसरा अमेरिकेला जाण्याचा प्रसंग..

अमेरिका – प्रा प्रकाश सोनवणे यांचा तिसरा अमेरिकेला जाण्याचा प्रसंग…… चला वाचुया अमेरिकेत, सहसा थंडीच्या हंगामात कुणी जात नाही. कारण इथे प्रचंड थंडी असते. साधारणपणे -10° ते -20° degree पर्यंत तपमान खालावते. बर्फवृष्टी होते ते वेगळेच ! घरे ,रस्ते, झाडे, गाड्या ही सर्व बर्फाखाली झाकली जातात ! कित्येक दिवस !! सारा व्यवहार ठप्प होतो व जन जीवन विस्कळित होते. मिशिगन नावाच्या राज्यात तर -40° तपमान या थंडीच्या दिवसात खालावते. असे असूनही आम्ही म्हणजे आमच्या सौभाग्यवती डॉ.प्राध्यापिका रत्नमाला यांनी डिसेंबर महिन्यात अमेरिकेत जाण्याचे ठरविले. कारण ही तसेच होते. गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये आमची मुलगी डॉ. प्रणाली हिचे अमेरिकेत इंजिनियर असलेला मुलगा श्री. शुभंकर यांच्याशी पुणे येथे लग्न झाले. लग्नानंतर मुलगी जावयासोबत दुसर्‍याच आठवड्यात अमेरिकेस गेली. तसेच अमेरिकेत वास्तव्यास असलेला आमचा इंजिनियर मुलगा चि. पियुष मुलीच्या लग्नानंतर पत्नी डॉ. ऐश्वर्यासह अमेरिकेत परतला. त्यामुळे या दोघांना ही भेटणे होईल या इच्छे पोटी मुलांच्या सांगण्यावरून डिसेंबर महिन्यात जाण्याचे ठरले. अमेरिकेची तिकीट 4 महिने अगोदरच मुलाने बूक केली. डिसेंबरमध्ये थंडी असते म्हणुन भरपूर गरम कपडे आणा असे मुलीचे व सूनबाईचे फर्मान होते, ते तंतोतंत आम्ही पाळले. अगोदर अमेरिकेतील पूर्वेस असलेल्या Pennsylvania राज्यातील फिलाडेल्फियाला मुलीकडे व तद्नंतर पश्चिमेस असलेल्या California येथे मुलाकडे जाण्याचे आमचे ठरले. भौगोलिक दृष्टीने वरील दोन्ही स्थळे ही विरुद्ध दिशेने व एकमेकां पासून 7/8 तासांच्या अंतरावर !Pennsylvania हे अमेरिकेचे 33 वे राज्य असून न्यू यॉर्क शहराच्या उत्तरेस आहे. त्यातील फिलाडेल्फिया हे शहर न्यू यॉर्क जवळील न्यू जर्सी शहरापासून 2 तासाच्या अंतरावर आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी आम्ही मुंबईहुन रात्री 10 वाजता विमानतळावरील सर्व सोपस्कार आटोपून सौदी अरेबियाच्या Emirates विमानात जाऊन बसलो. विमानाच्या प्रवेश द्वारावर हवाई अरेबियन सुंदरीनी आमचे स्वागत केले व आम्हास आमची बसण्याची जागा दाखवली. “चला सुरुवात तर चांगली” झाली या विचाराने जागेवर बसुन कमरेस पट्टा बांधला. जागेवर बसल्यानंतर मी सभोवताली नजर फिरवली असता आमच्या विमानात बरीच व्यापारी मंडळी दिसून आली तर काही आमच्या सारखेच मुलाना भेटायला जात असतील असे मला वाटले. आफ्रिकन तर क्वचिंतच होते. थोडे गोरे होते तर थोडे दक्षिण भारतीय होते. जागेवर बसल्यावर माझी चुळबुळ सुरू होती ते आमच्या आमच्या सौभाग्यवती याना बघवले नाही म्हणुन त्यांनी आमच्या कानात Air Phone लाऊन दिलेत व एक छानसा पिक्चर लावला. Emirates विमान तसे लांब प्रवासासाठी इतर विमान कंपन्यांपेक्षा फारच चांगले आहे. त्यात भर म्हणजे सुंदर हवाई सुंदरीनची !जेवण केल्यावर झोपी जाऊ या विचार करीत असताना वेळेवर विमानाने आकाशात झेप घेतली. बाकी सोपस्कार आटोपल्यावर हवाई सुंदरी यांनी जेवण आणले. भारतातून विमान उड्डाण झाले म्हणुन हवाई सुंदरी यांनी भारतीय जेवण दिले. चहा/ कॉफी हवे तेवढे उपलब्ध होते. अजून मला हवे होते त्यासाठी मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला व शेवटी मी नाईलाजास्तव झोपी गेलो. 3 तासाच्या प्रवासानंतर दुबई येथे विमानतळावर 2 तासाचा प्रवास खंड ( ley over ) होता. मुंबई वरूनच आमचा बॅगा आम्हास न्यू यॉर्क शहराच्या विमानतळावर मिळणार होत्या. त्यामुळे त्यांचे लोढणे आमच्या गळ्यात नव्हते. दुबई विमानतळावर उतरल्यावर पुनश्च: 4 ठिकाणी आमची सुरक्षा रक्षकांनी शारीरिक तपासणी केली. दुबई येथे आम्ही विमान बदलले व 2 तासानंतर आम्ही Air France कंपनीच्या नवीन विमानात जाऊन बसलो. पहिल्या विमानापेक्षा हे विमान मोठे होते. Dubble Decker ! प्रशस्त !! पुढचा प्रवास 20 तासांच्या आसपास होता. विमानात बसल्यानंतर विमानातील 50% पेक्षा ज्यास्त प्रवासी हे चीन देशातील असावेत असे वाटले. जापनीज सुधा असू शकतील. बर्‍याच प्रमाणात आफ्रिकन होते. आणि फारच कमी प्रमाणात भारतीय होते. पहिल्या विमानात जे होते ते दुबई येथे उतरलेत व दुसर्‍या विमानातून ही चिनी माणसे व इतरही अमेरिकेसाठी आमच्या विमानात आली होती. दुबई म्हणजे विमानांचे जंक्शन ! देशोदेशीचे हजारो विमाने इथे येतात. आणि पुढे आपल्याला इच्छित स्थळाकरिता प्रवासी इथे विमाने बदलतात. दुबई विमानतळ म्हणजे अवाढव्य ! प्रवाशांची धावपळ !! आपले विमान पकडण्यासाठी नुसती पळापळी !!!विमानाच्या खिडकीतून बघितले असता बाहेर अंधार होता. पुन्हा हवाई सुंदरी यांनी काहीतरी खायला आणले. त्यांनी आणलेले जेवण हे भारतीय नव्हते. तसेच ते अवेळी होते म्हणुन आम्ही ते नाकारले. आमच्या सौ.यांनी काहीतरी कोल्ड ड्रिंक मागवले. इतर प्रवासी मात्र पोटभर खात होते. काही तर विमानात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या अल्कोहोल ची मागणी करत होते व हवाई सुंदरी त्यांना आणून देत होत्या. थोड्याच वेळात विमानातील लाइट बंद झाले तसे सौ. चा आदेश आला, झोपा आता !! तसा झोपलो. 3 तासानंतर डोळे उघडले असता विमान शांतपणे कोणताही आवाज न करता मार्गक्रमण करत होते. सर्वत्र शांतता होती. नेहमीचे प्रवासी विमानातील आपल्या पुढील जागे समोरील खुर्चीवर लागलेल्या TV स्क्रीन वर सिनेमा बघत होते. पुन्हा झोपण्या शिवाय पर्याय नव्हता. आमचे विमान हे युरोपिअन देशांवरून जात असावे असा मला अंदाज आला व तसे TV स्क्रीन वर ही दिसले. अजून बरेच अंतर पार करायचे आहे असा कयास केला व पुन्हा झोपलो. 10 ते 12 तासांचा प्रवास संपला होता. मध्यंतरी दोनदा बाथरूम ला जाऊन आलो. सौ. मात्र गाढ झोपेत होत्या. हवाई सुंदरी धावपळ करीत होत्या. प्रवाशांना काय हवे ते आणून देत होत्या . पोटातले पाणीही हलत नव्हते असा प्रवास सुरू होता, मात्र एवढा वेळ बसल्यानंतर अवघडल्यासारखे झाले होत़े. दोनदा तर मी विमानातच फेर फटका मारला व पाय मोकळे केले. Business Class वाले मात्र पाय लांब करून व चादर अंगावर ओढून झोपलेले दिसले. मला तिथे जाण्यास हवाई सुंदरी यांनी मनाई केली. पुन्हा झोपी गेलो. काही तासानंतर मंजुळ आवाजात Good Morning friends असा आवाज ऐकू आला. सर्वच प्रवासी जागे झाले. युरोपातील पश्चिम युरोपातून विमानतळ जात होते. बाहेर पहाट असावी असा अंदाज आला. सकाळचा चहा व light biscuits आम्ही घेतले. विमानाने अटलांटिक महासागरावर प्रवेश केला तसा विमानास धक्के बसावयास सुरुवात झाली. हळू हळू धक्के जोरात बसायला लागलेत. सर्वचे घाबरले. आमच्या सौ. यांनी मला घट्ट पकडले, तेवढ्यात विमानाचे कॅप्टन यांनी घोषणा केली की “बाहेर प्रचंड ढग आहेत. त्यातून विमान जात आहे. शांत बसा व कंबरेचा पट्टा बांधुन ठेवा ! सर्वत्र स्मशान शांतता पसरली. मात्र 15- 20 मिनिटांनी विमानाचा प्रवास पुर्ववत झाला. मात्र सर्वांची झोप उडाली होती असा तो क्षण होता. डेन्मार्क राज्यांतून ग्रीनलॅन्ड मार्गे आमचे विमान अटलांटिक महासागरावरून अमेरिकेतील न्यू यॉर्क शहराकडे प्रवास करत होते. अटलांटिक महासागरात असलेल्या Blak whole चा परिसर बाजूस सारून सारी विमाने हा थोडा दूरचा प्रवास अवलंबतात. कारण Black Whole म्हणजे Bermuda triangle असलेली जागा. अटलांटिक महासागरात ही जागा विमान प्रवासाच्या मार्गात आहे. पूर्वीच्या काळी अनेक विमाने व या ठिकाणा जवळून जाणारी महाकाय जहाजे या triangle ने खेचलीत व ती इथे नाहीशी झालीत. आकाशातील विमाने सुधा इथे खेचली जातात व नाहीशी होतात म्हणुन अमेरिकेकडे जाताना विमाने सरळ रेषेत न जाता या triangle ला वळसा घालून जातात.Geenland ( island ) देशावरून विमान जात होते हे खिडकीतून स्पष्ट दिसत होते , कारण पांढरे शुभ्र बर्फाचे मैदान सर्वत्र दिसत होते. पहाट झाली असावी.थोड्याच वेळात आमच्या विमानाने पुन्हा अटलांटिक महासागरात प्रवेश केला तसा विमानात घोषणा झाली की ” काही तासात विमान हे न्यू यॉर्क विमानतळावर उतरणार आहे ” त्या बरोबर सर्वच प्रवाशांनी बसल्या बसल्या आपली तयारी सुरू केली. आम्हीही, सोबत आणलेल्या वस्तूंची बांधा बांध केली. बाहेर बर्‍यापैकी उजाडले होते. हवाई सुंदरी धावाधाव करायला लागल्या होत्या. प्रवाशांकडून जमा झालेली कागदी ग्लास व इतर वस्तू गोळा करू लागल्या होत्या. त्यात काही प्रवासी त्यांच्याकडे पाणी मागत होते. तेवढ्यात आम्ही दोघांनी बाथरूम मध्ये जाऊन ब्रश करून घेतला. त्यात मला चहाची तल्लफ लागली . मात्र विमान फ्रांस देशाचे होते म्हणुन चहा मिळाला नाही. त्या ऐवजी आम्ही इतर ड्रिंक घेतले. ताजेतवाने वाटले व लवकरच मुलाना भेटू या आनंदाने आवराआवर सुरू केली. पुन्हा घोषणा झाली, ” काही मिनिटात विमान न्यू यॉर्क विमानतळावर उतरणार आहे” तसे मी खिडकीतून बाहेर बघितले तर बरेच उजाडले होते. सकाळचे 9 वाजले असतील. जागेवरून कुणीही उठू नका व कंबरेला पट्टा बांधायची पुन्हा घोषणा झाली. याचा अर्थ विमानतळावर विमान काही क्षणात उतरणार आहे हा संदेश मिळाला. आणि आम्ही सकाळी 9: 30 वाजता न्यू यॉर्क विमानतळावर तळावर सुखरूप उतरलो. सोबत बॅगा नसल्याने लवकर विमानां बाहेर पडता आले. मात्र अमेरिकेतील विमानतळावर, बाहेरील देशांच्या प्रवाशांची कसून चौकशी व तपासणी होते. साधारणपणे पुढील प्रश्नांची सरबत्ती होते… तुम्ही कुठून आलात ??. इथे तुम्ही कुठे थांबणार आहात ?? ते काय काम करतात ? तुम्ही अमेरिकेत किती दिवस राहणारआहात ?परतीचे तिकीट दाखवा !वगैरे… यात आमचा 1 तास गेला. विमानतळावर विमाना तून बॅगा हया कस्टम विभागातर्फे संशय आल्यावर परस्पर उघडल्या जातात. आपली बॅग उघडली गेली आहे असे आपणास आपल्या बॅगवर खडूने × असा लिहिले जाते. काही गैर वस्तू बॅगेत सापडल्या तर मात्र त्याचे, अमेरीकन विमानतळावरून अमेरिकेत प्रवेश करणे कठीण असते. तपासणीचे सर्वच चाचण्या आटोपल्यावर आम्ही आमच्या बॅगाकडे वळलो. सर्वच् बॅगा आम्हास व्यवस्थित मिळाल्यात ! तेवढ्यात आमची कन्या डॉ. सौ. प्रणाली हिचा फोन आला. ” आम्ही बाहेर आलो आहोत. – 4° तपमान आहे. सोबत आणलेले थर्मल्स कपडे अगोदर परिधान करा मगच बाहेर पडा.” आम्हीही तयारीनिशी बाहेर गेटवर आलो तशी आमची कन्या धावत आली व आईला बिलगली ! एक वर्षाची ताटा तूट होती आईची व लेकराची !! दोन्ही रडल्या !!! बरोबर 1 वर्ष आमची कन्या आम्हास भेटली नव्हती !! मलाही बिलगली तसे मलाहि गहिवरून आले. डोक्यावरून हात फिरवला तशी ती पुन्हा रडली..बाहेर आमचे जावई प्रिय शुभंकर आपली स्वतःची BMW गाडी घेऊन आले होते. तिथपर्यंत आम्ही आमच्या बॅगा नेल्यात. जावयांनी आम्हास आदराने नमस्कार करून पायांना स्पर्श केला तसे आम्हास भरून ( आनंद व प्रेम ) आले. जावयांना मी छातीशी घेतले व त्यांच्याही डोक्यावरून हात फिरवला व आशीर्वाद दिला. बॅगा अवजड होत्या. प्रत्येकी 24 किलो ! अश्या 4 व लहान 2 गाडीही मोठी होती ! सगळे व्यवस्थित झाले ! आणि 20- 22 तासांच्या अवघड विमान प्रवासानंतर आमचा अमेरिकेच्या भूमीवर पुढचा दीड महिन्या साठीचा प्रवास सुरू झाला !!! लेखन……प्रा. प्रकाश सोनवणे माजी उप प्राचार्य Bhavan’s College Andheri. Mum- 589870185862फिलाडेल्फिया