(नाशिक )प्रतिनिधी। गेल्या पंचवीस वर्षांंपूर्वी सांस्कृतिक कक्ष म्हणून स्थापन झालेल्या मराठा सेवा संघ प्रणित संगीसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कला, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात मुशाफिरी करणारे दिलीप साळुंके यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी स्तुत्य निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि केशवराव भोसले यांच्या 105 व्या स्मृती वर्षानिमित्त सिल्वासा ( दादरा,नगर, हवेली) येथे आयोजित प्रथम आंतरराष्ट्रीय आणि पाचव्या राष्ट्रीय संमेलनात मराठा सेवा संघाचे संस्थापक युगपुरुष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अंतिम मान्यतेने मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी निवड घोषित करुन आपल्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र प्रदान केले. दि. 18 नोव्हेंबर, 2025 रोजी श्री. साळुंके विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश पावडे यांच्या कडून पदभार स्वीकारणार असल्याचे संस्थेने कळविले आहे.
श्रीलंका, सिंगापूर या दोन देशांसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, दादरा नगर हवेली, दिव दमन, राजस्थान, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, दिल्ली या राज्यात सध्या संस्थेच्या शाखा आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार संगीत सूर्य केशवराव भोसले यांचे रंगभूमीवरील कार्य नव्या पिढीसमोर आणून कला आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी कार्यरत आहेत.
कला, साहित्य, संस्कृती आणि पत्रकारिता या क्षेत्रात कार्यरत असलेले दिलीप साळुंके हे पथनाट्य, रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन, आकाशवाणी आणि लोकनाट्य या क्षेत्रात गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत असून विविध सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत ते अग्रभागी राहून राष्ट्र सेवा दल, लोकनाट्य लोककलावंत परिषद, बोलीभाषा संवर्धन साठी अहिराणी साहित्य संमेलन, अंधश्रद्धा निर्मूलन, साने गुरुजी कथामाला, नर्मदा बचाव आंदोलन, छात्र भारती, युवक बिरादरी, संपुर्ण साक्षरता मिशन, बालमजुरी विरोधी मोहीम, दक्षिणायन आणि इंडियन पीपल्स थेटर्स असोसिएशन (इप्टा) सारख्या राष्ट्रीय पातळीवरील चळवळीतून त्यांचें व्यक्तिमत्त्व विकसित झाले आहे. ते आजही सर्व चळवळीत सक्रिय आहेत.
आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार संगीतसूर्य केशवराव भोसले यांचें रंगभूमीवरील योगदान आणि त्यांची सामाजिक बांधिलकी लक्षात घेता नव्या पिढीसमोर त्यांचं महान कार्य राष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावर सेवक म्हणून ते पाच वर्षांपासून काम करीत होते. त्यांनी केलेल्या या कार्याचा आणि संपूर्ण आयुष्यात विविध सामाजिक चळवळीमध्ये त्यांचा असलेला उत्स्फूर्त सहभाग लक्षात घेऊन त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्तुत्य निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, संगीत सूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश पावडे, राष्ट्रीय सचिव प्रदीप पाटील, दादरा नगर हवेलीचे प्रदेशाध्यक्ष तथा निवृत्त सनदी अधिकारी अनंतराव निकम, कार्यालयीन सचिव कपिल पीच्छेवार,राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय पाटील, डॉ. सोपान क्षीरसागर, सुनील महाजन, मध्यप्रदेशचे अध्यक्ष तथा उद्योजक आर, एस, पाटील, उद्योजक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, वधू वर कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पी एन पाटील,गझल नवाज भीमराव पांचाळे, मराठवाड्याचे विभागीय आयुक्त (निवृत्त) डॉ. पुरुषोत्तम भापकर, आमदार चंद्रकांत रघुवंशी, डॉ. माधव कदम, लाइफ लाईनचे संचालक डॉ. प्रकाश पाटील, डॉ. जयश्री पाटील, सुनील नेरकर, जिएसटीचे अतिरिक्त आयुक्त अविनाश भामरेपाटील, ॲड. महेंद्र भावसार, आति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, अनंतराव पाटील, युनिव्हर्सल फाउंडेशनचे संचालक राम खैरनार, उद्योजक साहेबराव साळुंके, कृषी अधिकारी प्रभाकर साळुंके, मनोज साळुंके, विजय ठाकरे, पराग बेडसे, चंद्रशेखर पाटील आदिंची अभिनंदन केले आहे.



