मुंबई…..शिक्षण व्यवस्था चा बट्याबोळ सध्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. नवीन शैक्षणिक सत्र एक एप्रिल पासून सुरू करण्याचा अत्यंत ‘ऐतिहासिक’ निर्णय शिक्षण खात्याने घेतलेला आहे,हा निर्णय महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवणार असा आग्रह शासनाच्या बाजूने होताना दिसत आहे. सामाजिक बांधिलकी संपुष्टात आलेले लोक जेव्हा सत्तेवर येऊ लागतात तेव्हा असे तुगलकी निर्णय होणे आश्चर्यकारक म्हणता येत नाही. सात पिढ्यांनी दोन हातांनी उडवले तरी ज्यांची संपत्ती संपणार नाही. अशा लोकांच्या पायांनी जमीन कधीच सोडलेली असते. आपण व आपला परिवार जसे शाही जीवन जगत आहोत तशी तमाम जनता जगत आहे. असे आभास त्यांना होतात. त्यात गेल्या दहा-बारा वर्षात केंद्र असो व राज्य शिक्षण म्हणजे खेळ झालेला आहे. सर्वसामान्य माणसांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहातून हद्दपार करण्यासाठी दोन्ही स्तरावर अत्यंत विद्वान लोकांची शिक्षण मंत्री म्हणून निवड केले जात आहे. यासाठी स्वतःचे शिक्षण व अभ्यास हा निकष कधीच रद्दबातल झाला आहे. संघी अजेंडा जो व्यवस्थित राबवेल आणि खात्यातून स्वतः लूट करून आपल्यालाही हिस्सा देईल. असा माणूस या खात्याचा मंत्री केला जातो. राजकारणात शहाणपणा हा निकष हरवून सर्वार्थाने बाहुबली असणे हा निकष एक मात्र ठरतो,तेव्हा कोणतेही देशात यापेक्षा वेगळ्या चित्राची अपेक्षा करणे म्हणजे दिवा स्वप्न पाहण्यासारखे आहे. सीबीएससी पॅटर्न प्रमाणे सर्व शाळांचं शैक्षणिक सत्र एक एप्रिल पासून चालू करण्याचा हा जो क्रांतीकारक निर्णय आहे, तो अशाच प्रवृत्ती व परिस्थितीतून आलेला आहे. शिक्षण खात्याचे मंत्री महोदय व अधिकारी यांना सीबीएससी पॅटर्न हा थंड हवेच्या प्रदेशातून आपल्याकडे वाहत आलेला आहे. याची कदाचित जाणीव नसावी असण्याचेही कारण नाही कारण आता राजकारणात अभ्यास असणे आवश्यक नाही. डेहराडून,मसूरी, सिमला अशा थंड प्रदेशात सर्वप्रथम सीबीएससी पॅटर्नच्या शाळा सुरू झाल्या. तेथील थंड वातावरणामुळे एक एप्रिल पासून शैक्षणिक सत्र सुरू करणे सोयीचे होते. त्यामुळे देशाच्या उर्वरित भागात जेव्हा सीबीएससी पॅटर्न आला,तेव्हा तेच वेळापत्रक हवामान व पर्यावरण याचा विचार न करता देशभर लागू करण्यात आले. विदर्भाच्या 45° तापमानात कोट-टाय बांधून जाणारे विद्यार्थी दिसू लागले. येथे त्यातील अनेकांच्या शाळा वातानुकूलित आहेत. हा भाग वेगळा;परंतु पत्र्याच्या शेडमध्ये ओपन केलेले इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्येही विद्यार्थी ह्याच अवस्थेत जाताना दिसतात. त्याच विदर्भ-मराठवाड्यात खेड्यापाड्यात 45 अंश तापमानात एप्रिल महिन्यात अनवाणी शाळेत जाणारे विद्यार्थी हे चित्र आपण डोळ्यासमोर आणले तर अस्वस्थ होते. आपण शिक्षण क्षेत्रात व शिक्षण पद्धतीत काही अमुलाग्र बदल करत आहोत,हे दाखवण्यासाठी असे तुगलकी निर्णय घेणे हा एक फंडा व फॅशन झालेली आहे. विद्यार्थ्यांचे वय, ते वास्तव्यास असलेल्या भागातील पर्यावरण, भौगोलिक वैशिष्ट्ये याचा कोणताही विचार असे निर्णय घेण्यात करण्यात येत नाही. एकीकडे ब्रिटिशांच्या गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे त्यांनी निर्माण केलेल्या सीबीएससी पॅटर्नचे वेळापत्रक लागू करायचे या विरोधाभासत मोठी गंमत आहे;परंतु हे असेच चालू राहणार कारण मुलांचे शिक्षण व भवितव्य याच्यापेक्षा त्यांच्या आई-बापांना धर्म,जात व कर्मकांड याची चिंता पडलेली आहे. त्यामुळे कोणतेही पालक अशा तुगलकी निर्णयांच्या बाबत आवाज उठवायला तयार नाही. चॅम्पियन ट्रॉफी आता आपण जिंकलीच आहे आणि पुढे आयपीएल मध्ये कोणती टीम जिंकणार याची चिंता देखील ह्या लोकांना सतावत आहे. त्यामुळे ज्या इंग्रजांनी क्रिकेट खेळाचा शोध लावला ते इंग्रज हा खेळ खेळणे बंद झाले आहेत. आपल्या मात्र सर्व राष्ट्रभावना ह्या खेळाशी बांधल्या गेल्या आहेत. महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार असे व्यर्थ प्रश्न आपल्याला पडत नाही. त्यापुढे मुलांचा शिक्षण हा प्रश्न अत्यंत शुल्क व शूद्र आहे. एकदाच मिळालेले हे अनमोल जीवन असले विचार करून वाया घालवण्यापेक्षा एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट हा सुखी जीवनाचा मंत्र सगळ्यांनी मिळवला आहे. मुलांचं काय आपल्यासारखे जगतील आणि पाहतील त्यांचं ते आपल्याला त्याची चिंता करण्याचे कारण नाही. भविष्यात आपल्याकडे शिक्षण नसले तर आपल्याला शिक्षण नसलेल्या शासनाचे काही वाटणे देखील बंद होऊन जाणार आहे.
सौजन्य@ राहुल हांडे…..सा पोलीस व्हिजन धुळे करीता चांगली बातमी
