नोकरी मिळवून देतो अशा खोट्या आश्वासनाने मोठी फसवणूक

धुळे :सन 2013-पासुन निमसरकारी कार्यालये यातील महाराष्ट्र शासनाने नोकर भरती बंद करून ठेवली आहे.त्यातुन शासकीय नोकरी चे देखील पदभरती कुठे सुरू आहे किंवा नाही??ही पण शंका असतांना तरुण पिढी नोकरी साठी तरसत आहे.नोकरी नाही तर पुढे लग्न होणार नाही हा देखील मुद्दा आहे.म्हणुन नोकरी कुणी लावून देतो असे सांगितले की विश्वास हा बसतोच.अशाच प्रकारे शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश झाला असून धुळे शहरात दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बनावट नियुक्ती आदेश, खोटे आश्वासन आणि संगनमत करून आरोपींनी तब्बल 78 लाख 74 हजार 500 रुपये उकळल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात अंबिका नगर, चाळीसगाव रोड परिसरातील वंदन संजय मोराणकर (वय 25) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग-05 गु.रं. 54/2026 अंतर्गत BNS कलम 318(2), 318(4), 336(2), 336(3), 340(2), 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चाळीसगांव रोड पोलीस स्टेशन धुळे व पच्छिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मे 2023 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान आरोपींनी मोबाईलद्वारे संपर्क साधून आरोग्य विभाग, आयकर विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी, त्यांचे भाऊ तसेच परिचितांना बनावट नियुक्ती आदेश पोस्ट व ई-मेलद्वारे पाठवून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ऑनलाइन 39 लाख 74 हजार 500 रुपये व रोख 22 हजार रुपये असे एकूण 61 लाख 74 हजार 500 रुपये घेत आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणातील 8 आरोपींची माहिती तपासाच्या दृष्टीने गोपनीय ठेवण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोसई संदीप काळे करत असून प्रभारी अधिकारी श्री. सुरेश कुमार घुसर आहेत.

दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात देवपूर येथील संत्संग कॉलनी परिसरात राहणाऱ्या सोनाली किशोर साळुंखे (वय 40) यांच्या फिर्यादीवरून भाग-06 गु.रं. 49/2/2026 अंतर्गत BNS कलम 61(1), 318(4), 316(2), 336(3), 340(2), 351(2)(3) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी रोशन राजाराम सेवाणे (रा. सटाणा, जि. नाशिक), तिलकचंद अंबर पाटील, हेमराज तिलकचंद पाटील, प्रतिभा तिलकचंद पाटील (रा. रहिमपूर, ता. शिंदखेडा) तसेच एका अन्य साथीदाराने उत्पादन शुल्क खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीच्या नातेवाईकाच्या नावाने बनावट जॉईनिंग ऑर्डर तयार करून 17 लाख रुपये रोख स्वीकारण्यात आले. मात्र नोकरी न लावता पैसे परत न केल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले.

या प्रकरणाचा तपास पोसई किरण कोठुळे करत असून प्रभारी अधिकारी श्री. सचिन अरुण कापडनीस मार्गदर्शन करत आहेत.

दरम्यान, शासकीय नोकरीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, नियुक्ती प्रक्रिया अधिकृत माध्यमांतूनच केली जाते, असा इशारा पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.नोकरीचे खोटं आश्वासनाला कुणीही थारा देऊ नये अशी देखील सुचना केली आहे.