वस्त्रनगरी इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा

इचलकरंजी -(सा पोलीस व्हिजन न्युज ब्युरो)
वस्त्रनगरी इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी गावभागातील जुनी गावचावडी येथे मानाचा पारंपारिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला.प्रतिवर्षाप्रमाणे शहर व परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जात होते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला. त्याचबरोबर घरात मातीचे बैल आणून त्यांची हरभरर्‍याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पुजा करुन त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला.

बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या स्टॉलवर बळीराजाने गर्दी केली होती. सकाळपासून बैलांना आंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येत होती. शहरात अनेक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रमही पार पडला.
सायंकाळी शतकोत्तर परंपरेनुसार इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्यावतीने गावभागातील महादेव मंदिरनजीक पारंपारिक पध्दतीने कर तोडण्याचा कार्यक्रम
देवाशिष पाटील, शिवाशिष पाटील यांच्या हस्ते पार पडला.

तत्पूर्वी उत्सव कमिटीच्यावतीने घेण्यात आलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यती व जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, आयुक्त सुधाकर देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपअधीक्षक समीर सिंग साळवे आदी मान्यवरांचे हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *