गरिब हमालाचा मुलगा झाला न्यायाधीश….

अठरा विश्व गरिबीतुन,मेहनत करत मुलाने साधली प्रगती….

आपला मुलगा,पंख्या खाली बसणारा टेबलावरचा अधिकारी व्हावा-आईची इच्छा….

दोंडाईचा पंचक्रोशीत प्रथम न्यायाधीश होण्याचा मिळाला मान, अनेक मान्यवरांकडून सत्कार…

प्रथम ध्येय गाठले, नंतर न्यायाधीश होऊन प्रगती साधली-जे.एम.एफ.सी. परिक्षा उत्तीर्ण न्यायाधीश श्री अमोलजी मराठे…

सा.पोलीस व्हिजन चा सलाम..

दोंडाईचा- शिक्षण घेण्यासाठी हवी फक्त जिद्द मग त्यातुनच पुढचं ठरतं खरे गणित, शिक्षण हे वाघणीचे दुध आहे,ते सर्वानी पचवावे असे समाजात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटते.पण ते पचवण्यासाठी जी जिद्द चिकाटी,मेहनत, परिस्थितीशी दोन हात करायची तयारी लागते, ती प्रत्येकाच्याच अंगी देवाने-ईश्वराने दिलेली आहे, पण त्याचे चीज-महत्त्व -संधीचे सोने सर्वांना-प्रत्येक व्यक्तीला करता येईल असे होत नाही.म्हणुन परिस्थिती कशीही असो,माणुसच आपल्या प्रगतीचा शिल्पकार आहे असेही जुने जाणकार लोक म्हणतात. ते काही खोटे नाही आहे आणि ही जी म्हण आहे ती खरी करून दाखवली आहे. ती एका गरिब, हमालाच्या घरात जन्म घेतलेल्या अमोल मराठे (काळे) यांनी. म्हणजे घरात लहानपणापासून अठरा विश्व दारिद्र्य, वडील व्यवसायाने हमाल आणि त्यांची मागची पिढी म्हणजे आजोबाही हमाल,अशा गरिब कुटुंबात श्री अमोल मराठे (काळे) यांचा जन्म झाला.घरात दोन भाऊ,एक बहिण असे पाच लोकांचे कुटुंब. त्यात आईचे ही शिक्षण जेमतेम झालेले होते.मात्र आपली मुले ही भविष्यात हमाली करुन गरिबीत जीवन जगू नये-काढू नये.म्हणून आईने लहानपणापासून त्यांना वाघिणीच्या दुधाचे-शिक्षणाचे महत्त्व पटवले.त्यावेळी सर्व मुलांनवर पैसे खर्च करून शिक्षण देण्याची जरी परिस्थिती नव्हती.तरी आईने आलेल्या पैशातुन पोटाला चिमटी घेत,बचत करत-नियोजन करत मुलांना शिक्षणाच्या बाळकडू व्यसनाची सवय जडवली व एके दिवशी आपल्या रिटायर्ड मावश्याच्या पेन्शन कामानिमित्त एम.एस.ई.बी. म्हणजे वीज वितरण कंपनीतील साहेबांच्या टेबलावर आपला लहान मुलगा अमोलला सोबत घेऊन चकरा मारने जेव्हा चालू झाले. तेव्हा लहान अमोलने आपल्या आईला प्रश्न केला की,आई आपण ऐवढे चकरा ह्या टेबलावर बसलेल्या काकाकडे का मारतो आहे ? तेव्हा थकलेल्या चेहऱ्याने व नेहमी पेंशन कामासाठी हताश होऊन परत फिरणाऱ्या आईने आपला लहान मुलगा अमोलला सांगितले की,बेटा जर तुला आयुष्यात कोणाला हताश-कामानिमित्त आलेल्या माणसांना दु:खी पहायचे नसेल, तर पंख्याखाली टेबलावर बसलेल्या व्यक्तीसारखा अधिकार हो,लोकांचे दु:ख-यातना समज. सरकारी कार्यालयाचा अधिकारी बनून त्यांचे दुःख,यातना कमी कर,असे चेहऱ्यावर असलेल्या निराशा,व दुःखी मनातुन भावना व्यक्त करताना सांगितले व आईची तीच गोष्ट लक्षात ठेवून अमोलने आपला गरिबीतुन शिक्षण संघर्षाचा प्रवास सुरू केला.ह्या शिक्षण प्रवासात अनेक अडचणी, अनेक दुःख -यातनाचे प्रसंग आले.तरीही अमोलने खचून न जाता पुढे महाविद्यालयीन शिक्षण सुरू ठेवले . तसेच शिक्षण सुरू असताना आपल्या वयाचे व आपल्या पेक्षा लहान वयाच्या मुलांचे कोचींग क्लास घेऊन शिक्षण दिले व त्या मोबदल्यात आलेल्या दोन पैशातुन कुटुंब चालवायला आईला हातभार लावत, स्वतः चा शिक्षणाचा खर्च भागवत,पुढचे शिक्षण चालू ठेवले व नेहमी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा माध्यमातुन सराव करत-परिक्षा देत ,एकेदिवशी कोर्टाच्या परिक्षेचा निकाल लागल्यावर,मित्राने जसा फोन केला की,अम्या तु कोर्टाची-न्यायालयाची लिपीकची परिक्षा पास झालेला आहे.तेव्हा अमोलला तो आनंद गगनात मावेनासा झाला होता.कारण त्या दिवशी अमोलने आपल्या आईचे, स्वतः आपण लहानपणी पाहिलेले-उराशी बाळगलेले स्वप्न पुर्ण झाले होते.

तद्नंतर न्यायालयाची नोकरी पदरी पाडल्यावरही अमोलचे जनतेच्या तक्रारीप्रती असलेले हळवे मन व आईने लहानपणी सरकारी कार्यालयाशी चकरा मारत,दु:खी-हताश मनाने लोकांच्या समस्या सोडवण्या विषयी कानावर टाकलेले शब्द शांत बसू देत नव्हते. न्यायालयात लिपीकाच्या पदावर काम करताना डोक्याच्यावर भला मोठा पंखा होता, पंख्याखाली टेबल होता व टेबलावर लोकांच्या समस्यांचा ढीग होता.पण हा ढीग कमी करायचा कसा, लोकांना कमी वेळात न्याय द्यायचा कसा,हा प्रश्न नेहमी अमोलला सतावत होता.अशातच अमोलने मग आपल्या मनाशी चंग धरत न्यायालयात लोकांना न्याय देण्यासाठी न्यायाधीश होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.म्हणजे अमोल पंख्याखाली टेबलावर बसणारा अधिकारी झाला व आईने सांगितलेले ध्येय देखील पुर्ण केले.मात्र त्या ध्येयाला यशाच्या शिखरावर नेयायचे बाकी होते.म्हणजे न्यायालयात आलेल्या त्रासलेल्या-कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या निर्दोष लोकांना कमी वेळात न्याय कसा देता येईल, यासाठी न्यायाधीश होणे हे शिखर गाठणे गरजेचे होते.त्यासाठी अमोलने पुन्हा दिवसरात्र मेहनत घेत.स्पर्धा परिक्षा द्वारे जे.एम.एफ.सी.च्या म्हणजे दिवाणी न्यायाधीश “क” स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परिक्षा देत नुकतेच यश संपादन केले आहे.

आज एक हमालाचा मुलगा न्यायाधीश झाला ही गोष्ट त्याच्या परिवारासाठी निश्चितच स्वप्न बघितल्यासारखी आहे.म्हणुन व्यवसायाने हमाल असलेल्या अमोलचे वडीलही डोळ्यात अश्रू आणत म्हणतात की,मुलगा न्यायाधीश झाला,हे आमच्यासाठी स्वप्नच पाहण्यासारखे आहे.पण हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपल्या बापाची गरिबीची जाण ठेवत,आईने गरिबीत घेतलेले कष्ट,हाल अपेष्टा व दिलेले वाघिणीच्या दुधाचे-शिक्षणाचे बाळकडू व मुलगा पंख्याखाली टेबलावर बसणारा अधिकारी व्हावा, ह्या पाहिलेल्या स्वप्नांला प्रत्यक्षात उतरवत घेतल्याल्या कष्ट्राचे मुलाने चीज केले आहे.यावेळी जे.एम.एफ.सी. परिक्षा उत्तीर्ण म्हणजे दिवाणी न्यायाधीश “क” व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परिक्षा पास झालेले श्री अमोलजी मराठे साहेब ही सांगतात की,मी प्रथमतः अधिकारी व्हायचे ध्येय गाठले आणि नंतर न्यायाधीश होऊन प्रगती साधली आहे.म्हणुन जो आनंद मला प्रथमतः अधिकारी झाल्यावर झाला,तोच आनंद आज न्यायाधीश झाल्यावरही कायम आहे.माझ्या दोन पिढीत मी प्रथम सरकारी नोकरी व ह्या पदावर पोहचवणारा व्यक्ती आहे आणि ह्या पदावर विराजमान होऊन पिडीत -त्रासलेल्या निर्दोष लोकांना न्याय कसा देता येईल हाच उद्देश असणार असल्याचे शेवटी त्यांनी चेहऱ्यावर स्मितहास्य आणत सांगितले.आज अमोलजी मराठे (काळे) सारख्या सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या व्यक्तीला कायद्याच्या ऐवढ्या मोठ्या पदावर बसलेले पाहून दोंडाईचा शहर-पंचक्रोशीतील लोक त्यांच्या सत्काराला, भेटीला रोज येत आहे, सहाजिकच दोंडाईचा शहर-पंचक्रोशीत प्रथम न्यायाधीश होण्याचा मान मिळाल्याने दोंडाईचाकरांचा देखील हुर्र भरून आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *