वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकर
दि. ६ जानेवारी २०२५ रोजी रस्ता सुरक्षा अभियान निमीत्त महामार्ग पोलीस केंद्र धुळे, नेमणूकीतील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवळी, असिस्टंट पोलीस सब इंस्पेक्टर जावेद पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल यतिन देवरे, विशाल मोहने, कॉन्स्टेबल गणेश भामरे, कॉन्स्टेबल मयुर पाटील असे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर पेट्रोलिंग करीत असतांना सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास महामार्ग क्रमांक ३ वरील पारोळा ब्रिजवर टेम्पो रिक्षा क्रमांक एम.एच.०२.वाय.ओ. ६३३२ वरील टेम्पो चालका हा रिक्षामध्ये गोणपाठ भरुन धुळे कडुन शिरपुरकडे जात असतांना त्यांच्या रिक्षाचा अचानक अपघात होऊन‚ रिक्षा जागीच पलटी होऊन त्यांना गंभिर दुखापत झाली. सदरवेळी पारोळा ब्रिजवर गस्त करीत असलेले नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना लागलीच रिक्षातुन बाहेर काढले असता‚ त्यांचा डोक्यातुन कानातुन व नाकातुन खुप रक्तस्त्राव होत होता. व ते बोलण्याचे परिस्थितीत नव्हते. त्याप्रसंगी कर्तव्यावर असलेल्या महामार्ग पोलीसांनी त्यांच्या मोबाईल मधुन त्यांच्या नातेवाईकांना फोन करुन रिक्षा चालक यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव बापु शंकर नागमोती, वय ५२ वर्ष, रा. पवन नगर, धुळे असे सांगितले. त्यांना अपघाताची माहिती देऊन तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला फोन करुन त्यांना अपघातानंतर अवघ्या तासाभरात सिव्हील हॉस्पिटल, धुळे येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासुन प्रकृती गंभिर असल्याचे सांगितले. त्यांनतर त्यांचे नातेवाईकांनी त्यांना पुढील उपचारासाठी विघ्नहर्ता रुग्णालय, धुळे येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन पुढील ४८ तास निरीक्षणात ठेवण्याचे सांगितले. सध्या बापु नागमोती यांची प्रकृती बरी असुन त्यांचेवर वैद्यकीय उपचार सुरु आहे. त्यांना वेळेवर उपचारासाठी पोलीसांनी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महामार्ग पोलीसांनी, बापु नागमोती यांना अपघातानंतर अवघ्या तासाभरात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे नातेवाईकांनी महामार्ग पोलीसांचे आभार व्यक्त केलेले आहे. पोलीस निरीक्षक श्रीमती तृष्णा गोपनारायण, महामार्ग पोलीस धुळे विभाग, पोउनि/प्रताप पाटील, प्रभारी अधिकारी, म.पो. केद्र धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि / लक्ष्मण गवळी, असई / जावेद पठाण, पोहेकॉ/यतिन देवरे, पोहेकॉ/विशाल मोहने, पोकॉ/गणेश भामरे, पोकों/मयुर पाटील यांनी अपघातातील दुखापती यांना गोल्डनअवर मध्ये रुग्णालयात दाखल करुन जीव वाचविलेला आहे. महामार्ग पोलीसांकडुन सर्व नागरीकांना रस्ता सुरक्षा अभियान निमीत्त आवाहन करण्यात येते की, महामार्गावर वाहन चालवित असतांना सर्व वाहतुक नियमांचे पालन करावे जेणेकरुन अपघात टळतील.
