प्रतिनिधी/धुळे
साने गुरुजी यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येक शिक्षकाने घ्यावा व आपल्या शाळांची आणि विदयार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहावे. असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शुभम गुप्ता साहेब जिल्हा परिषद धुळे यांनी हिरे भवनात संपन्न झालेल्या एक भव्यदिव्य कार्यक्रमात केले. २४ डिसेंबर रोजी साने गुरुजींच्या जयंती निमित्ताने आयोजित आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक व जीवन गौरव पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला संबोधित करतांना वरील विधान त्यांनी शिक्षकांना उददेशून केले.
यावेळी जि.प.चे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, प्रभारी शिक्षणाधिकारी बी.एस.अकलाडे, विशाल देसले, शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे, राज्याध्यक्ष श्रीराम बहिर, कोषाध्यक्ष रामराव पाटील, पेन्शनर संघटनेचे अनंतराव पाटील, प्रकाश पवार, विकास मुळे, संघटनेचे राज्यउपाध्यक्ष नरेंद्र देवरे, डी.डी.महाले, मुकेश बाविस्कर, सुहास जैन, तसेच संघटनेचे चारही तालुक्यांचे तालुका अध्यक्ष सतिश पाटील, नवनित ठाकरे, सुरेश पाटील व संजय पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.नविनचंद्र भदाणे यांनी केले. तर सुत्रसंचलन दिपक पाटील व नंदा पवार यांनी केले.
कार्यक्रमात संजय अमृतकर आहिल्यादेवी नगर, डांगशिरवाडे केंद्र शाळेचे श्रीकांत अहिरे, बाभुळदे शाळचे राकेश पाटील व सवाईमुकटीचे मनोजकुमार पाटील यांना आदर्श शिक्षकाचे पुरस्कार दे>न गौरवण्यात आले. तर जि.प.शाळा व्होऱ्यापाणी ता.शिरपूर, केंद्र शाळा कासारे, ता.साक्री, केंद्रशाळा दभाषी, ता.शिंदखेडा, लोहगड शाळा ता.धुळे यांना आदर्श शाळा या पुरस्काराने गौरवण्यात आले. बोराडी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक तापीराम पावरा यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला व नंदा पवार पदोन्नती मुख्याध्यापक यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

