सा पोलीस व्हिजन धुळे क्राईम… दिड वर्षांपूर्वी हरवलेला मोबाईल पोलिसांनी शोधून काढला, चार महिन्यांत 36 मोबाईलचा शोध

दिड वर्षांपूर्वी हरवलेला मोबाईल पोलिसांनी शोधून काढला, चार महिन्यांत 36 मोबाईलचा शोध

दिड वर्षांपूर्वी हरवलेला मोबाईल पोलिसांनी शोधून काढला, चार महिन्यांत 36 मोबाईलचा शोध
धुळे : शहरातील ज्येष्ठ नागरिक डॉ. शरद वाणी यांचा दीड वर्षांपूर्वी गहाळ झालेला मोबाईल पोलिसांनी अखेर शोधून काढला असून, त्यांना मंगळवारी परत दिला. पोलिसांच्या सायबर सेलने गेल्या चार महिन्यांत 36 मोबाईल तक्रारदारांना परत मिळून दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ते दीड वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिक डॉ. शरद वाणी (वय 79) यांचा मोबाईल धुळे शहरातील बाजारपेठ भागात भाजीपाला खरेदी करताना गहाळ झाला होता. सदर मोबाईल हा त्यांना त्यांच्या नातवाने वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भेट म्हणून दिला होता. त्यामुळे या मोबाईलशी त्यांचे भावनिक नाते जुळले होते. मोबाईल हरवल्यामुळे शरद वाणी खूप दुःखी झाले होते. “तुमचा मोबाईल आता काही परत मिळणार नाही”, असे बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितले. “तुम्ही काही तक्रार करू नका. कारण त्याचा काही एक उपयोग होणार नाही”, असे देखील त्यांना सांगण्यात आले होते.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या एका कार्यक्रमात धुळे पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी ज्येष्ठ नागरिकांना काही समस्या असल्यास निसंकोचपणे कळवावे, असे आवाहन केले होते. त्यामुळे डॉ. शरद वाणी यांनी मोबाईल गहाळ झाल्याबाबतची माहिती आझादनगर पोलिसांना तसेच सायबर पोलीस ठाण्याला देखील दिली. सायबर पोलीस ठाण्यातील अंमलदार दिलीप वसावे यांनी सतत पाठपुरावा करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईलचा शोध लावला. सदर मोबाईल मध्यप्रदेशातील सुजलपुर या ठिकाणी असल्याची माहिती त्यांनी मिळवली आणि 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल डॉ. वाणी यांना परत मिळून दिला. त्यानंतर डॉ. शरद वाणी यांना सायबर पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात मोबाईल घेण्यासाठी बोलावण्यात आले. सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी त्यांचा मोबाईल त्यांच्या ताब्यात दिला. त्यावेळी डॉ. शरद वाणी भावनिक झाले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांना वृक्षाचे रोप देऊन त्यांचा सत्कार केला.
मोबाईलचा शोध घेण्याची कार्यवाही पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार दिलीप वसावे यांनी केली.
धुळ्याच्या सायबर सेलने जून 2023 पासून आतापर्यंत 36 मोबाईल तक्रारदार यांना परत मिळवून दिले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.आता असेच काही जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत त्यांना ही मोबाईल परत कसे मिळतील?? यासाठी धुळे पोलीस प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *