शिक्षक दिन हा भारताचा गौरवदिन व्हावा

(राष्ट्र उभारणीसाठी शासन,शिक्षक,पालक, विद्यार्थी व प्रसारमाध्यम यांची भुमिका)

शासन आणि शिक्षण
ज्या देशाची शिक्षणव्यवस्था मजबूत असेल तोच देश प्रगत आणि विकसित असतो. त्यामुळे शासनाने अधिकाधिक शिक्षणक्षेत्राकडे लक्ष देणं अगत्याच आहे.आपल्या आम बजेटमध्ये शिक्षणक्षेत्रासाठी भरीव तरतुद करणं अतिशय महत्वाच आहे. जपान तथा युरोपियन विकसित देशांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की ते त्यांच्या आम बजेटचा २० ते ३० टक्के वाटा शिक्षण क्षेत्रावर खर्च करतात हेच खरं कारण ते देश विकसित आणि प्रगत असण्याचं आहे. मात्र आपल्या देशाच चित्र अतिशय धक्कादायक आहे. आम बजेटच्या फक्त २ ते ३ टक्के तरतुद शिक्षण क्षेत्रासाठी असते. त्यामुळेच भारताची शिक्षण व्यवस्था पुर्णतः ढासळलेली आहे.
भारतीय शिक्षण व्यवस्थेची विदारक परिस्थिती बघता भारतीय शासनकर्ते जनतेवर राज्य करण्यासाठी जो निसर्ग नियम आहे त्यासाठीच प्रयत्न करत आहे की काय असे वाटते, तो नियम म्हणजे “जी जनता दरिद्री व अशिक्षित असेल तिच्यावरच राज्य करता येते” यासाठीच तर शिक्षण व्यवस्थेची राज्यकर्त्यांनी वाट लावली की काय अशी शंका येते.
आज शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त असतांना भरती नाही,जे शिक्षक आहे त्यांना शाळाबाह्य इतर कामात गुंतवून त्यांना शिकवू देत नाही. खाजगी शाळांना उत्तेजन देवून सरकारी शाळा मोडीत काढण्याचे धोरण अवलंबील्या जात आहे.शिक्षणाप्रती शासनाची ही उदासीनता बघता भारताचं भवितव्य अंधारमय असल्याच जाणवते. सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. ती योग्यपणे निभविल्यास खऱ्या अर्थाने महात्मा फुले सावित्रीमाईने या देशात शिक्षणाची पेटविलेली ही मशाल प्रज्वलीत होवून विश्वात भारत प्रकाशमान होईल यात शंका नाही.
शिक्षक आणि शिक्षण
शिक्षकच खऱ्या अर्थाने समाजाला योग्य दिशा देण्याच कार्य करीत असतो त्यामुळे भारताचं महासत्ता होण्याच स्वप्न शिक्षकच पूर्ण करु शकते,त्यासाठी विवेकशील विज्ञानवादी पिढी तयार करणे आवश्यक आहे तरच हे स्वप्न पूर्ण होवू शकते, हे कार्य शिक्षकाच्याच हातून घडू शकते. हे कोणीही नाकारु शकत नाही. त्यासाठी शिक्षकी पेशात येणाऱ्यांनी नोकरी म्हणून नव्हे तर समर्पन म्हणून येणाराच या पेशाला न्याय देवू शकते.शिक्षक हा सदैव विद्यार्थी असावा लागतो.त्याला नेहमी ज्ञानाची भुक असावी लागते.आपलं नाॕलेज सदैव अपडेट ठेवणारा असावा. इतर देशांमध्ये शिक्षकांचा पगार सर्वात जास्त असतो याच कारण त्यानी पन्नास टक्के रक्कम आपलं ज्ञान वाढविण्यासाठी खर्च करने व पन्नास टक्के रक्कम उपजीविकेसाठी खर्च करने बंधनकारक असते.त्यामुळे अध्यापनाच्या व्यतिरीक्त मिळणारा वेळ हा तेथील शिक्षक अभ्यासात ज्ञानार्जनात वाचनात ग्रंथालयात घालवतांना आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे इतर देशातील शिक्षकांचा दर्जा उच्च कोटीचा असल्याचे दिसून येते.याउलट भारतीय शिक्षक त्यांचा संपूर्ण पगार हा स्वतःच्या उपजीविकेसाठी प्रपंचासाठीच खर्च करतांना दिसते,त्यातून एक पुस्तक खरेदी करतात की नाही अशी स्थिती आहे.आपल्या देशात ज्ञानवृद्धीसाठी खर्च करणारे शिक्षक नगन्य आहे. आपण भारतीय शिक्षक अध्यापनाव्यतिरीक्तचा वेळ हा ज्ञानार्जनासाठी फारच अल्पसा व्यतीत करतो. आपल्या बऱ्याच शिक्षकांचा हा वेळ अन्य जोड व्यवसायात खर्च होतांना दिसते.अशा शिक्षकांकडून गुणवत्तेची अपेक्षा करणे म्हणजे भ्रमनिराशच. यावरही प्रत्येक शिक्षकाने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.
पालक आणि शिक्षण
प्रत्येक पालक आपल्या मुलासाठी मोठ मोठी स्वप्न बघत असतो.आपल्या मुलाने खुप प्रगती करावी,आपल्यापेक्षा खुप काही बणावं ही त्याची अपेक्षा असते परंतु अपेक्षा करतांना भारतीय पालक शाळा शिक्षक शासन यांच्यावर सगळी जबाबदारी देवून मोकळा होतो.तो स्वतः मुलाला वेळ देत नाही, वेळ दिला ही तरी तो त्याच्यावर शैक्षणिक मार्गदर्शन करण्यास सक्षम नसतो. इतर विकसित देशातील पालक हे आत्मनिर्भर असते ते आपल्या पाल्यासाठी स्वतः सर्व भुमिका पार पाडतात. विद्यार्थी हा चोवीस तासापैकी अठरा तास पालकाच्या सानिध्यात असतो. फक्त सहा तास हा शाळा शिक्षकांच्या सानिध्यात असतो.तेव्हा मुलांच्या शिक्षणासाठी पालकांची भुमिका सर्वात जास्त महत्वाची आहे.
विद्यार्थी आणि शिक्षण
मातीच्या गोळ्याला जसा आकार देवू तशी ती माती आकार घेते. विद्यार्थ्यांचही तसचं आहे, त्याला कसा आकार द्यायचा ते शिक्षक पालक समाज व शिक्षानिती तयार करणारं शासन यांचेवर निर्भर आहे. मुल्यशिक्षण त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारं शिक्षण आदर्श नागरिक घडवू शकते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेळ व अभ्यासाचे नियोजन याचा मेळ घालून जिद्द आणि चिकाटी हे गुण अंगीकारुन प्रयत्न केल्यास हमखास यश येणार हे लक्षात घ्यावे.
प्रसारमाध्यम आणि शिक्षण
शासनाला शैक्षणिक गुणवत्ता,अभ्यासक्रम निश्चीतीत दिशानिर्देश देणे,देशाच्या धर्मनिरपेक्षतेला एकात्मतेला व बंधुभावाला बाधा येईल अशा अभ्यासक्रमातील घटकावर आक्षेप नोंदवून शासनाच्या निदर्शनास आणून समाजजागृती करने.अभ्यासक्रमातून वैज्ञानिक दृष्टीकोन,अंधश्रद्धानिर्मुलन या मुल्याच्या जपनुकीसाठी पाठ्यक्रम मंडळावर नियंत्रण ठेवणे त्याच प्रमाणे शिक्षणक्षेत्रावर जास्तीत जास्त आम बजेटमध्ये तरतुदीसाठी आग्रही असने आदींसाठी प्रसारमाध्यमांद्वारा शासनाला वेळोवेळी बाध्ये केले पाहिजे.परंतु हल्ली समाजात आध्यात्मीकतेच्या नावावर तथाकथित गुरुंचे प्रमाण फार वाढले असून समाजाला दैववादाकडे लोटण्याचे काम मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रानीक मिडीयाद्वारा सूरु आहे. दैववाद हा मानसाच्या प्रगतीतला फार मोठा अडसर असून कर्मवादच विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू शकते, तेव्हा प्रत्येक विद्यार्थाने कर्मवादीच बणले पाहिजे. आपले बळीराजापासून ते गौतम बुद्ध,शिवाजी महाराज ते शाहु फुले आंबेडकर हे महापुरुष आणि संत तुकाराम महाराज,संत गाडगेबाबा,संत तुकडोजी महाराज… आपले आईवडील व शिक्षक हेच आपले खरे गुरु आहे, शिष्याचा अंगठा मागणाऱ्या गुरुंपासुन समाजाला सावध करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी आपली भुमिका पार पाडावी. तरच खऱ्या अर्थाने शिक्षकदिन हा भारताचा गौरव दिन होईल.असे प्रतिपादन शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र चे प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र सालेकर यांनी कळविले आहे.बातमी पत्र वाचा सा.पोलीस व्हिजन धुळे.
✒️ रामचंद्र सालेकर, राज्यउपाध्यक्ष
शिक्षणमहर्षी डाॕ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *