💥💥 खूशखबर
🟣 अखेर मान्सून महाराष्ट्रात डेरेदाखल; येत्या ३ ते ४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार
पुणे- उकाड्याने हैराण होऊन बसलेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केरळनंतर आता मान्सून महाराष्ट्रात डेरेदाखल झाला आहे. आज रविवारी ११ जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर येत्या ३-४ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळणार, असा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यातील शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. मान्सूनच्या आगमनाची वार्ता ऐकताच सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र, या सगळ्या शक्यतांवर मात करत मान्सून आज ११ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत पोहोचला आहे. तर कर्नाटकातील शिमोगा, हसन या शहरांसह धर्मपुरी, श्रीहरी कोटा इथपर्यंत मान्सून पोहोचला आहे.
मान्सून दाखल होण्याचा दरवर्षीचा अंदाज पाहता यंदा मान्सून चार ते पाच दिवस उशिरानं दाखल झाला आहे. दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच, हवामान विभागाने येत्या तीन ते चार तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रात येत्या ३-४ तासात रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, IMD ने याबाबत माहिती दिली आहे.
